परत ये…….
स्वप्नांच्या गावात आज धुकं दाट
शीतल चांदणं पसरतंय हळूहळू शोधत वाट
पुसटश्या उजेडातही अडखळत नाही पायवाट
फुलांनीही ठरवलंय आता नाही थांबायचं दरवळण्यापासून
खरं सांगू, माझीही तयारी झालीय आनंदी रहायची तुझ्यावाचून
ही ’तयारी’ ’सवय’ व्हायच्या आत परत ये………
पाऊसही मध्ये थोडा रुसून बसला होता
रिमझिम बरसणंच जणू विसरला होता
आठवत असतीलही त्याला आपल्या ’श्रावणभेटी’
पण पावसानही ठरवलंय सरतेशेवटी नाही थांबायचं रिमझिम बरसण्यापासून….
खरं सांगू, माझीही तयारी झालीय आनंदी रहायची तुझ्यावाचून
ही ’तयारी’ ’सवय’ व्हायच्या आत परत ये………
दूर जाताना वाटत होतं, ’क्षणभरासाठीच’ दुरावतोय
कधीतरी भेट होईल या आशेने आता आपणच आपल्याला सुखावतोय
त्याचवेळी मनानं बंड केलं असतं तर कदाचित दुरावलोही नसतो
पण हळूहळू मनही रुळतंय आणि सुखाची फुलं वेचतयं शोधून शोधून….
खरं सांगू, माझीही तयारी झालीय आनंदी रहायची तुझ्यावाचून
ही ’तयारी’ ’सवय’ व्हायच्या आत परत ये………
तू आता आलीच नाहीस तर काय होईल?
माझा प्रेमावरचा आत्मविश्वासच उडून जाईल
माझा विश्वास तर फार पूर्वीच मी तुला दिलाय
आता त्यात ’आत्म’ असे काहीच नाही
तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी तरी परत ये….
तशी माझी तयारी झालीय आनंदी रहायची तुझ्यावाचून
ही ’तयारी’ ’सवय’ व्हायच्या आत परत ये………
ओंकार खरे